(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
आईच्या अनैतिक संबंधांना विरोध आणि मुलाच्या चैनीखोर वागण्याचा राग यातून एका आईनेच आपल्या २४ वर्षीय मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराच्या मदतीने मुलाचा काटा काढण्यासाठी तिने सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या कटानुसार तरुणाला मद्यातून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या आणि त्यानंतर नायलॉनच्या काथ्याने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आई, तिचा प्रियकर आणि त्याचे पाच मित्र अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बेळगावजवळ खून करून मृतदेह केएलई रुग्णालयाजवळील महामार्गाशेजारी झुडपात फेकण्यात आला होता. अवघ्या आठ दिवसांत माळमारुती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
विजय नारायण (वय २४, रा. आरटीनगर, बंगळूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी राकेश परशुराम जामुनी (वय ३४, रा. भीमनगर, तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), श्रीमती मीना नारायण (वय ४४, रा. आरटीनगर, बंगळूर), सचिन मल्लाप्पा कांबळे (वय ३४, रा. कवळीकट्टी रोड, तेरणी), मनोज दुंपाप्पा कांबळे (रा. भीमनगर, तेरणी), तम्माण्णा रविंद्र कांबळे (वय २१, रा. कवळीकट्टी रोड, तेरणी), एकनाथ उमाप्पा कांबळे (वय ३२, रा. भीमनगर, तेरणी) आणि एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील सहाही जण गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावचे रहिवासी असून, मीना बंगळूरची आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी केएलई छत्रीजवळ महामार्गाशेजारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. माळमारुती पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दोन दिवसांनी मीना आणि तिचा प्रियकर राकेश हे खडेबाजार पोलीस ठाण्यात पोहोचले. विजय २८ ऑक्टोबर रोजी बंगळूरहून बेळगावचा राज्योत्सव पाहण्यासाठी आला होता. सरदार मैदानाजवळून तो बेपत्ता झाल्याची तक्रार मीनाने पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तिला अनोळखी मृतदेह दाखविल्यानंतर तो आपला मुलगा विजय असल्याचे तिने ओळखले.
मृताची ओळख निश्चित झाल्यानंतर माळमारुती पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. विजय बंगळूरहून कोणासोबत बेळगावला आला होता, याची माहिती घेतली असता तो राकेश जामुनी याच्यासोबत कारने आल्याचे मीनाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राकेशची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याचे समोर आले.
राकेशच्या कबुली जबाबानुसार, मीनाच्या सांगण्यावरूनच विजयच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. २८ ऑक्टोबर रोजी राज्योत्सव पाहण्याच्या निमित्ताने विजयला बंगळूरहून बेळगावला आणण्यात आले. बेळगावजवळ आल्यानंतर महामार्गावर त्याच्या मद्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून देण्यात आल्या. त्याचा परिणाम होऊन विजयला गुंगी येऊ लागल्यानंतर कार काकतीजवळील जंगल परिसरात नेण्यात आली. विजय चालकाच्या बाजूच्या पुढील आसनावर बसला होता, तर मागील बाजूस त्याचे साथीदार होते. विजय झोपेच्या आणि नशेच्या अंमलाखाली असताना मागे बसलेल्या आरोपींनी नायलॉनच्या काथ्याने त्याचा गळा आवळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वजण केएलई छत्रीजवळ आले. तेथे महामार्गाशेजारी मृतदेह फेकून आरोपी गडहिंग्लजच्या दिशेने निघून गेले.
या हत्येमागील कारणांचाही पोलिस तपासात उलगडा झाला आहे. मीनाच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले असून, ती मुलगा विजयसोबत राहत होती. पतीकडील आणि वडिलांकडील मालमत्ता तिच्या नावावर असल्याने बंगळूरमध्ये तिला दरमहा ७० ते ८० हजार रुपये भाडे मिळत होते. दोन बंगले आणि अन्य मालमत्ताही तिच्याकडे असल्याची माहिती आहे. विजयला दारूचे व्यसन लागले होते आणि दारू पिऊन तो आपल्याला त्रास देत होता, असे मीनाचे म्हणणे होते. त्यातच विजयला आई आणि राकेश यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती मिळाली होती. या विषयावरून तो आईशी वारंवार भांडण करत होता. त्यामुळे आपल्या संबंधांना अडथळा ठरणाऱ्या मुलाला संपविण्याची सूचना मीनानेच राकेशला दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कटात राकेशने आपल्या गावातील मित्रांनाही सहभागी करून घेतले. तेरणी गावात शेजारी राहणाऱ्या मित्रांना त्याने बंगळूरला चैनी करण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले होते. तेथे सर्वांनी चार दिवस मौजमजा केली. त्यानंतर कारमधून बेळगावकडे येत असताना राकेशने मित्रांना विजयच्या हत्येच्या कटाची माहिती दिली. त्यानंतर नशेच्या अंमलाखाली असलेल्या सर्वांनी या हत्येत सहभाग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. केवळ चैनीसाठी बंगळूरला गेलेले राकेशचे मित्रही या गंभीर गुन्ह्यात अडकले असून, माळमारुती पोलिसांनी आठ दिवसांत संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला आहे.


