(माणगाव)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर जुने माणगाव येथील गुरुकृपा हॉटेलसमोर सोमवारी सकाळी १०.३० वाजता एका भरधाव खाजगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक अशोक भिकू सोनार (वय ६५, रा. सुतारवाडी, जुने माणगाव) यांचा मृत्यू झाला, तर रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले.
अपघाताच्या वेळी अशोक सोनार हे त्यांची रिक्षा (क्र. MH-06-BV-2193) महामार्गाच्या कडेला थांबवून रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत होते. याच वेळी मुंबईहून महाडकडे भरधाव वेगाने निघालेली खाजगी बस (क्र. MH-11-CH-7611) रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरून थेट उभ्या असलेल्या रिक्षावर आदळली.
या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. गंभीर जखमी झालेल्या अशोक सोनार यांना तातडीने मुंबईकडे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सोनार कुटुंबीयांवर आणि स्थानिक समाजावर शोककळा पसरली आहे. या अपघातात परी अनिल सोनार (वय ११, जुने माणगाव), अश्विनी स्वप्नील दळवी (वय ३०) व साईशा स्वप्नील दळवी (वय ४, दोघी रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व) हे तिघे जखमी झाले आहेत.
जखमी अश्विनी दळवी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी बसचालक कालिदास बाबुराव कोकरे (रा. कुंभारमाठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध IPC कलम 125(अ), 125(ब), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.