(नवी मुंबई)
ठाणे जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. 5 लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी कोकण विभागाचे उपआयुक्त (पुरवठा) अनिल सुधाकर तकसाळे (वय 55) यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सीबीडी बेलापूर येथे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात साई प्रतिम माधव (42) आणि राजा गणेश थेवर (52) या दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांनी अधिकाऱ्याच्या वतीने लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हा तांदूळ व्यापारी असून, 30 डिसेंबर 2025 रोजी भिवंडी येथे झालेल्या छाप्यानंतर अन्नधान्याच्या अवैध साठ्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या व्यावसायिक भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात उपआयुक्त अनिल तकसाळे यांनी 5 लाख रुपयांची एकरकमी लाच आणि दरमहा 1.5 लाख रुपयांचा हप्ता मागितल्याचा आरोप आहे, अशी माहिती ठाणे ACBचे निरीक्षक सचिन मोरे यांनी दिली.
या मागणीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याने 5 जानेवारी रोजी ACBकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACBने नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या सापळ्यात आरोपींपैकी एकाला अधिकाऱ्याच्या वतीने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपासात कोकण भवन येथील कार्यालयातून अनिल तकसाळे यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

