(नवी मुंबई)
कोकण रेल्वेने आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून लवकरच संस्थेचे सुमारे १५०० कोटी रुपयांचे जुने कर्ज फेडून ती कर्जमुक्त होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. नवी मुंबईतील बेलापूर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“कोकण रेल्वे ही देशातील एकमेव रेल्वे संस्था आहे जी सुरुवातीपासूनच नफ्यात आहे,” असे झा यांनी अभिमानाने नमूद केले.
विकास योजनांची माहिती:
झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या मार्गावर सध्या ७२०० कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित असून, यावर्षी १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामध्ये स्थानकांचे आधुनिकीकरण, ट्रॅक क्षमतेत वाढ, संरक्षित ड्रेनेज यंत्रणा, आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. गेल्या दीड महिन्यांत कोकण रेल्वेने सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या निविदा मिळवल्या असून संबंधित कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानकांचा पुनर्विकास आणि सुविधा:
- रत्नागिरी स्थानकाचा पुनर्विकास लवकरच एमआयडीसीच्या सहकार्याने सुरू होणार.
- पूर्वी बंद केलेले १६ रेल्वे थांबे पुन्हा सुरू करण्यात आले.
- ६९ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत.
- दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट – दरवर्षी २०० घटना होत असत, आता केवळ २-३ घटना
- महाराष्ट्रातील ११ रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिम कोकण रेल्वेमार्फत राबवली जाणार.
कर्जफेड आणि आर्थिक सक्षमीकरणाचे टप्पे:
- आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस कोकण रेल्वेवर ८,८३८ कोटी रुपयांचे कर्ज होते.
- यामधील १५०० कोटी रुपये आर्थिक रोखे (Debentures) होते, तर उर्वरित इतर संस्थांकडून घेतलेले होते.
- कंपनीने ७८० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCD) आधीच फेडले असून, उर्वरित रक्कम नियोजित वेळेत फेडली जाणार.
- २०२५ मध्ये ८७.५ कोटी, तर २०२६ मध्ये २५० कोटी रुपयांच्या NCDs परतफेडीची तयारी सुरू आहे.
- संपूर्ण परतफेड संस्थेच्या स्वतःच्या उत्पन्नातून केली जाणार आहे.
कोकण रेल्वेचं भविष्य उज्ज्वल:
“आमचं आर्थिक व्यवस्थापन मजबूत आहे. १५०० कोटींचं कर्ज लवकरच फेडण्यात येईल. यंदाच्या आर्थिक वर्षात १३० ते १४० कोटी रुपयांचा नफा अपेक्षित असून, हा नफा केवळ कर्जफेडीसाठी नव्हे तर सेवा-विकासासाठीही वापरण्यात येणार आहे.”
— संतोषकुमार झा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे