(मुंबई)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचे संबंध कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याची माहिती समोर आली आहे.
हरियाणा-राजस्थान सीमेवरून अटक
मुंबई क्राईम ब्रांचने हरियाणा आणि राजस्थान सीमेवरील विविध ठिकाणांवरून आरोपींना अटक केली. यामध्ये रोहित शेट्टी यांच्या घरावर थेट गोळीबार करणारा मुख्य शूटर दीपक शर्माचाही समावेश आहे. सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने पुढील तपासासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी दिली.
कोण आहेत अटक झालेले आरोपी?
नव्यानं अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रितिक यादव, सनी आणि सोनू यांना आग्रा येथील बहाबीजौली परिसरातून अटक करण्यात आली. तर मुख्य शूटर दीपक शर्मा याला नोएडातील सेक्टर-45 सादरपूर येथून ताब्यात घेण्यात आलं. बहादुरगड एसटीएफचे प्रभारी निरीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की, दीपक, रितिक यादव, सनी आणि सोनू यांच्यावर यापूर्वीही प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
50 हजारांत सुपारी, परदेशी पिस्तुलाचा वापर
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, दीपक शर्माला परदेशी बनावटीचं पिस्तुल देऊन गोळीबारासाठी 50 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आरोपी सनी आणि सोनू यांनी आधी रोहित शेट्टी यांच्या घराची रेकी केली होती. गोळीबारानंतर हे सर्व आरोपी रातोरात मुंबईतून पसार झाले होते. त्यानंतर रितिक यादवने त्यांना लपण्यासाठी मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
आधीही एक आरोपी अटकेत
या प्रकरणात यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी आसाराम फसाळे याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. तो गेल्या चार वर्षांपासून पुण्यात गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. टोळीचा मास्टरमाईंड शुभम लोणकर याच्या सूचनेनुसार आसाराम फसाळे आरोपींना शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पोलीस तपासानुसार, या टोळीचा उद्देश चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांना घाबरवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा होता. त्यासाठीच कलाकारांच्या घरांवर गोळीबार करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे.
शनिवारी रात्री उशिरा जुहू परिसरात रोहित शेट्टी यांच्या घरासमोर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे बॉलिवूडसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. घटनेनंतर सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय आरजू बिश्नोई याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत ध्वनीफीत व्हायरल केली होती.
सीसीटीव्हीमुळे सुत्रे हलली
मुंबई पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाल्याचं स्पष्ट झालं. पुढील तपासात सर्व आरोपी पुण्यातील वारजे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्यांना जेरबंद करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

