(संगमेश्वर)
संगमेश्वर पोलीस ठाण्यात नुकतीच नियुक्ती झालेल्या नूतन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा सत्कार संगम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष प्रमोद भार्गवराम शेट्ये यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संघाच्या वृक्षारोपण व विविध उपक्रमांच्या काळात पोलिसांचे, विशेषतः तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय झावरे व इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य नेहमीच लाभले. त्यांनी त्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला.
संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनीही आपले विचार मांडताना पो.नि. राजाराम चव्हाण यांची मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग या ठिकाणी केलेली उल्लेखनीय सेवा व प्रभावी कारकीर्द याचे कौतुक केले. त्यांनी आशा व्यक्त केली की, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहकार्य संघास भविष्यातही मिळत राहील.
सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी संघास आपल्या पूर्ण सहकार्याचा विश्वास दिला. या कार्यक्रमाला संघाचे कोषाध्यक्ष जनार्दन शिरगावकर, सदस्य प्रकाश कोळवणकर, विनायक पात्रे, भिकाजी साळवी, बाबासाहेब प्रभावळे आदी मान्यवर उपस्थित होते.