(मुंबई)
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर आहे. राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यभरातील ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आरोग्यमंत्री यांचे अभिनंदन केले आहे.
आरोग्य मंत्री यांनी सांगितले की, राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणात एनएचएम कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार जून २०२५ पासून देय असलेल्या मानधनावर १५ टक्के वाढ लागू होईल. त्यापैकी ५ टक्के वाढ सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिली जाईल, तर उर्वरित १० टक्के वाढ कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकन अहवालावर आधारित असेल.
याशिवाय, शासनाने कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामध्ये –
- १० वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा एकवेळचा पर्याय,
- ‘एनएचएम कर्मचारी कल्याण निधी’ स्थापन करून गंभीर आजार, अपंगत्व वा मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक मदत,
- अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता,
तसेच २०१६-१७ पूर्वी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे,
अशा तरतुदींचा समावेश आहे. या मागण्यांवरील पुढील कार्यवाही सुरु असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून एनएचएम कर्मचारी भरीव मानधनवाढीसाठी आग्रही होते. त्यांनी यासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलनही केले होते. अखेर शासनाने त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास आरोग्यमंत्री यांनी व्यक्त केला.
काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)?
राष्ट्रीय आरोग्य अभियान हे देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण अभियान असून, याअंतर्गत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यात एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली असून, शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

