(मालवण)
शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या रत्नागिरीतील अस्मी मनोहर गोविलकर (वय १०) या शाळकरी मुलीचा गुरुवारु सकाळी सुमारे अकराच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.
रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालकांचा सुमारे २५ ते ३० जणांचा समूह गुरुवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. या समूहात अस्मी गोविलकर ही मुलगी तिच्या आई मोहिनी गोविलकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. किल्ल्यावर भर उन्हात फिरत असताना अस्मीला अचानक चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली.
तत्काळ तिच्यासोबत असलेल्या पालकांनी तिला होडीने मालवण येथे आणून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अस्मीच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून आई मोहिनी गोविलकर यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अस्मीला लहानपणापासून हृदयविकाराचा आजार असल्याची माहिती तिच्या आईने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत तसेच पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. या घटनेची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

