(ठाणे)
दहशतवादी कारवायांच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) सोमवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या संघटनेशी कथित संबंध असलेल्या १२ कट्टर समर्थकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, घातपाताच्या कटाचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. या कारवाईदरम्यान आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रास्त्रे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
२२ ठिकाणी छापेमारी, ३०० हून अधिक कर्मचारी तैनात
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने एटीएसने सोमवारी पहाटे ४ वाजता ही शोधमोहीम सुरू केली. तब्बल ९ तास सुरू असलेल्या या कारवाईत २२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत १०० एटीएस अधिकारी व कर्मचारी, तसेच ठाणे ग्रामीणचे २०० पोलिस सहभागी होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट नाकाबंदी करण्यात आली होती.
ISIS मॉड्युलमागे ‘साकीब नाचन’चा हात
या कारवाईमागे सिमी (SIMI) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आणि सध्या एनआयएच्या ताब्यात असलेला साकीब अब्दुल हमिद नाचन असल्याचं स्पष्ट झालं आहे. साकीब आणि त्याचे सहकारी पडघा-बोरिवली परिसरात राहणारे असून, भडकावू भाषणं आणि चिथावणीखोर प्रचाराद्वारे त्यांनी युवकांना दहशतवादी कारवायांकडे प्रवृत्त केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
गोपनीय माहितीवरून मोहीम; शस्त्र व आक्षेपार्ह साहित्य जप्त
एटीएसला मिळालेल्या विश्वसनीय गुप्त माहितीनुसार, साकीब नाचनच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती राज्यात घातपाताची योजना आखत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, ठाणे यांनी न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवून ही शोधमोहीम राबवली.
छापेमारीदरम्यान मोबाईल हँडसेट्स, तलवारी, सुरे, संशयास्पद कागदपत्रे, तसेच दहशतवादाला उत्तेजन देणारे साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या १२ व्यक्तींपैकी अनेक जण साकीबच्या भाषणांनी ‘रॅडिकलाइज’ झाले असल्याचं एटीएस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.