(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यात सुरू असलेल्या सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेचा परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकांवरही झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एसआयआर मोहीम पूर्ण झाल्यानंतर तयार होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानंतर आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया स्थगित केली.
754 ग्रामपंचायतींमध्ये नवीन मतदार यादीचा वापर होण्याची शक्यता
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 754 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अद्ययावत मतदार यादी वापरली जाण्याची शक्यता आहे. नव्या यादीत मयत, दुबार, स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळली जाणार असल्याने मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे. मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या 754 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, आता मतदार यादीची प्रतीक्षा
या ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले असून, यंदाही सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार आहे. सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडतही पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यात प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. त्यानुसार 4 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, एसआयआर मोहिमेमुळे राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता
एसआयआर मोहिमेनंतर 17 ऑगस्ट 2026 रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी, तर 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्याच यादीच्या आधारे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत.

