(मुंबई)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (एमएससीई) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षांत टीईटी परीक्षेचा निकाल सरासरी तीन ते साडेतीन टक्क्यांच्या आसपास राहिल्याने ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जात होती. मात्र, यंदा निकालात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली असून, अंतरिम निकाल जाहीर झाल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता.
टीईटी 2025 चा अंतरिम निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, उमेदवारांना तो त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकालासंदर्भात आक्षेप किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून, प्राप्त आक्षेपांचा विचार करून अंतिम निकाल काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.
टीईटी परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर पार पडली होती. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. उत्तरसूचीवर आक्षेप नोंदवण्याची मुदत 27 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. तज्ज्ञ समितीच्या मतानंतर 13 जानेवारी रोजी अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकालावर आक्षेप नोंदवण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे राबवण्यात आली असून, उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपला निकाल पाहू शकतात.
दरम्यान, शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडील निर्णय लक्षात घेता, यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टीईटी 2025 च्या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. वाढलेली पात्रता टक्केवारी शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सकारात्मक मानली जात आहे.
यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये पेपर 1 साठी 2 लाख 3 हजार 334, तर पेपर 2 साठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवार नोंदणीकृत होते. परीक्षा परिषदेतर्फे 2013 पासून आतापर्यंत आठ वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली असून, एकूण 29 लाख 74 हजार 600 उमेदवारांपैकी केवळ 1 लाख 6 हजार 663 उमेदवार पात्र ठरले आहेत. सरासरी पात्रता प्रमाण 3.5 टक्के इतके आहे. यापूर्वी 2018 मध्ये सर्वाधिक 5.13 टक्के निकाल लागला होता.
दरम्यान, 2018 आणि 2019 मधील टीईटी परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या 9 हजार 537 उमेदवारांची पात्रता रद्द करण्यात आली होती. यंदा जाहीर झालेल्या अंतरिम निकालावर आलेल्या आक्षेपांचा विचार करून अंतिम निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

