(कोपरगाव)
समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना त्यांच्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीही गाडीत अडकून पडल्याने बचाव पथकाला त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दोघांवरही सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
जितेंद्र शेळके हे भोंदू बाबा अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. ते ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांमध्येही खरात यांच्याशी त्यांचा संबंध असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात याला अटक झाल्यानंतर शेळके मानसिक तणावाखाली असल्याची माहितीही समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

