(रत्नागिरी)
तालुक्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला एका तरुणाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात सुशांत प्रकाश कांबळे (वय २३, रा. गव्हाणे, ता. लांजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत कांबळे हा आपल्या जखमी मित्रासह उपचारासाठी चांदेराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांनी जखमी युवकावर उपचार सुरू केले. मात्र उपचार सुरू असतानाच सुशांत याने डॉ. मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत जाऊन सुशांत याने डॉक्टर मोरे यांना हाताचा थापट देत मारहाण केली.
डॉक्टरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि डॉ. मोरे यांना आधार दिला. डॉ. मोरे यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे या गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.