(रत्नागिरी / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सापुचेतळे बसस्थानक व आठवडा बाजार परिसरात कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. हिवताप प्रतिरोध कार्यक्रम 2025 अंतर्गत ग्रामस्थांना माहितीपत्रके वाटण्यात आली आणि रुग्णवाहिकेच्या स्पीकरवरून मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव यांनी उपस्थित नागरिकांना कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी उपाय योजना समजावून सांगितल्या. त्यांनी डास निर्मूलनासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचे, डबकी बुजवण्याचे, पाण्यावर वापरलेले इंजिन ऑइल टाकण्याचे, गप्पी मासे सोडण्याचे आणि कीटकनाशक वापराच्या महत्त्वावर भर दिला.
एडिस डासांचे लार्वा पाण्यातच वाढतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री. एस. ए. कांबळे (MPW) यांनी केले. कार्यक्रमात आरोग्य विभागाचे अधिकारी व वाडीलिंबू रिक्षा संघटना, ग्रामस्थ उपस्थित होते.