(रत्नागिरी)
तालुक्यातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येत आवाज बुलंद केला आहे. प्रकल्पासंदर्भातील हरकतींवरील वैयक्तिक सुनावणी नुकतीच उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली असली, तरी सामूहिक सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. अशातच शनिवारी (दि. १९ जुलै) खंडाळा येथे एक जनआक्रोश सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेमुळे एमआयडीसीच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ही सभा ‘वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती’, ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था’ आणि ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथील ‘सर्वसाक्षी श्रद्धा प्रतिष्ठान’मध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे वकील व मानवाधिकार विश्लेषक ॲड. असीम सरोदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कायदेशीर लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सभेत वाटद एमआयडीसीच्या अधिसूचनेला कायमस्वरूपी रद्द करण्याची जोरदार मागणी केली जाणार आहे. या लढ्यास कायदेशीर दिशा देण्यासाठी ॲड. सरोदे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही समितीकडून सुरू करण्यात आली आहे.
या सभेला ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये या सभेबाबत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाविरोधातील भूमिका अधिक ठाम आणि एकमुखी बनण्याची शक्यता आहे.