(रत्नागिरी / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ साठी आयोजित या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. भक्ती मनोर दळी आणि शहर सरचिटणीस श्री. निलेश महादेव आखाडे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक सजावट, कोकणी वाडा, किल्ले तसेच पौराणिक देखावे अशा विविध संकल्पनांवर साकारलेल्या सजावटींनी लक्ष वेधून घेतले. स्पर्धकांनी पाठविलेल्या फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेत श्री. सुधाकर सिताराम कर्लेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी कर्लेकर वाडी, रत्नागिरी येथे ‘जंगलातील गुहा आणि धबधबा’ ही थीम साकारली होती. श्री. अनिश विजय पेडणेकर (विश्वनगर, रत्नागिरी) यांनी ‘गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला’ या थीमसाठी द्वितीय क्रमांक मिळवला. श्री. श्रेयस मयेकर यांनी राजापूर येथील धृतपापेश्वर मंदिराचा देखावा साकारत तृतीय क्रमांक मिळवला.
उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी श्री. अनिरुद्ध लेले (राजेंद्र नगर) यांच्या नारळाच्या झापापासून केलेल्या सजावटीची, श्री. सोहम गोडबोले (अभ्युदय नगर) यांच्या विष्णू अवतार सागर देखाव्याची, कु. सायली कर्लेकर (कर्लेकर वाडी) यांच्या केदारेश्वर गुहेच्या प्रतिकृतीची आणि श्री. राजेश भारती (आंबेशेत, रत्नागिरी) यांच्या आई महालक्ष्मी मूर्ती प्रतिकृती देखाव्याची निवड करण्यात आली.
सर्व विजेत्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. विजेत्यांना आरती संग्रह, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजकांसह महिला मोर्चा सरचिटणीस प्रज्ञा टाकळे, शहर उपाध्यक्ष संतोष सावंत, शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, विक्रम जैन, सौ. सायली बेर्डे, शहर उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, सौ. निधी निलेश आखाडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस नपुरा मुळ्ये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून कोकणच्या गणेशोत्सवाची शोभा वाढवली. त्यांच्या सहभागाबद्दल आयोजक भक्ती दळी आणि निलेश आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले.


