(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील साळवी स्टॉप येथे एकमार्गी रस्त्यावर चुकीच्या दिशेने भरधाव दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात देवरुख येथील संदिप लक्ष्मण भारते (३२) हे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप भारते हे २३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता होंडा पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच ०८ ओआर ०१५९ घेऊन कोल्हापूरहून रत्नागिरी शहराच्या दिशेने येत होते. साळवी स्टॉप येथील स्वरूप बार अँड रेस्टॉरंटसमोर ते आले असता समोरून होंडा डिओ दुचाकीवरून एक अज्ञातस्वार येत होता. पोलिस तक्रारीनुसार, नाचणे लिंक रोडकडे जाण्यासाठी असलेल्या एकमार्गी रस्त्यावर संबंधित दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने वाहन चालवत होता. रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीची पर्वा न करता हयगयीने व बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने त्याने संदिप भारते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेत संदिप भारते यांच्या हातापायांना दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पोहेकॉ रणजित रमाकांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला. अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

