(संगमेश्वर/ वार्ताहर)
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर आणि पोरबंदर या तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी “निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे)” या फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने गेल्या दीड वर्षांपासून सातत्यपूर्ण आंदोलन सुरू आहे. या मागणीसाठी निवेदन, आंदोलन, उपोषण अशा विविध माध्यमांतून आवाज उठवण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर दिनांक २८ मे २०२५ रोजी संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. या शिष्टमंडळात श्री. दीपक पवार, श्री. संतोष पाटणे, श्री. मुकुंद सनगरे आणि श्री. अशोक मुंडेकर सहभागी होते. यावेळी खासदार राणे यांनी लवकरच दिल्लीत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या मागणीचा मार्ग मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले.
संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा न मिळाल्याने स्थानिक प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना सातत्याने व्यक्त होत होती. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी व बेलापूर येथील कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली असून, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यालयाशीही प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. मात्र, नेहमीच “थांब्याची अंतिम मंजुरी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून मिळावी लागते” असे कारण देत निर्णय लांबवण्यात येत होता.
स्थानकाच्या उत्पन्नात मोठा वाटा असणाऱ्या संगमेश्वर रोडला थांबा मिळावा, यासाठी स्थानिक नागरिक, प्रवासी, व विविध संघटनांनी केलेला पाठपुरावा आता यशाच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.
“लवकरच या मागण्या मान्य होतील व संगमेश्वर परिसरातील नागरिकांचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल,” असा विश्वास संघटनेचे सर्व सदस्य आणि स्थानिक प्रवाशांनी व्यक्त केला आहे.