(लांजा)
बोरथडे (ता. लांजा) येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या कौलारू शाळेचे छप्पर शुक्रवारी सायंकाळी अचानक कोसळले. सुदैवाने त्या वेळी शाळेला सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, बोरथडेतील शाळा याच पावसामुळे प्रभावित झाली. शाळा जुनी आणि मोडकळीस आलेली असल्याने सुटीच्या कालावधीत डागडुजी करणे अत्यावश्यक होते. मात्र, वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच लांजाचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित विभागाला तातडीने माहिती दिली. गावकऱ्यांनीही शाळा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला असला, तरी काही शाळांची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. उपलब्ध निधी अपुरा ठरत असल्याने आणखी निधीची आवश्यकता भासू लागली आहे.
या घटनेनंतर प्रशासनाला सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळायच्या असतील, तर सर्व मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने पाहणी करून योग्य ती उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.

