(सातारा / वृत्तसंस्था)
सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत झालेल्या भीषण कार अपघातात चिपळूण येथील कदम-पवार कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. मुंबईहून चिपळूणकडे परतत असताना आज (शनिवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आईसाहेब क्षेत्राजवळ हा अपघात घडला. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून ती महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि तीन वेळा पलटी झाली.
या दुर्घटनेत विजय धोंडू पवार (वय ७०) आणि वैष्णवी वैभव कदम (वय ४३, दोघेही रा. चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर वैभव वामन कदम (वय ४५), वैशाली विजय पवार (वय ६२) आणि वेदांत वैभव कदम (वय १३) हे तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव कदम हे कुटुंबीयांसह कारने (MH-१४-BK-७९३३) मुंबईहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होते. सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथे पोहोचल्यानंतर चालक वैभव कदम यांना डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरला जोरात धडकली. धडकेनंतर कार तीन वेळा उलटल्याने त्यातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत विजय पवार आणि वैष्णवी कदम यांचा मृत्यू झाला. चिपळूणच्या कदम-पवार कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


