(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अद्वैत पेट्रोल पंपाजवळ १५ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. गोव्याहून मुंबईकडे निघालेली क्रेटा कार महामार्गावर उभी असलेल्या आयशर डंपरवर भरधाव वेगात जाऊन आदळली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत यास्मीन इरफान कुरेशी (५४), फिजा अनस कुरेशी (२७), महम्मद इरफान इस्लाम कुरेशी (१५, सर्व रा. नागपाडा, मुंबई) आणि कारचालक मुस्तफा अल्ताफभाई काफी (२०, रा. गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणात तपासानंतर लांजा पोलिसांनी कारचालक आणि डंपर चालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक मुस्तफा अल्ताफभाई काफी याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघात घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच आयशर डंपर चालक महेश कुमार नुन्नुचँद महतो (वय २६, रा. झारखंड) याने महामार्गावर डंपर उभा करूनही मागील बाजूस इशारा दर्शविणारी आवश्यक परावर्तित चिन्हे (रिफ्लेक्टर), इंडिकेटर किंवा अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना डंपरची कल्पना न आल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरील छायाचित्रांमधून डंपरच्या मागील बाजूस आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याची बाब चर्चेत आली होती. तसेच हा डंपर दोन दिवसांपासून महामार्गाच्या कडेला उभा असल्याची माहितीही समोर आली होती. या सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण कोकणासह मुंबई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

