(चिपळूण)
कार्यकर्ता पक्ष वाढवणारा असावा, पक्षाचा सन्मान करणारा असावा, कोणतीही पदे भांडून मिळत नाहीत. काम करून दाखवा, पदे आपोआप मिळतील. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात कुठलीही पदे मागितलेली नाहीत. ती आपोआप मिळत गेली. येथे मी खासदार असेपर्यंत कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही. कोणाला माझी तक्रार करायची असेल तर बिनधास्त करा, मला त्याची फिकीर नाही. आम्हाला विचारूनच येथे नेमणुका व्हायला हव्यात, पक्षहितासाठी मी यापुढेही बोलणारच, असा हल्ला खासदार नारायण राणे यांनी शनिवारी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कोणाचेही नाव न घेता चढवला.
शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्यातील कमी अनुपस्थितीवरून खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांचा चांगला समाचार घेताना खडेबोल सुनावले. आगामी निवडणुकांसाठी काम करा, पक्ष वाढवा, ताकद मजबूत करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि पक्षाला यश मिळवून द्या, असे आवाहनही केले.
या मेळाव्यात चित्रा चव्हाण, परिमल भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. पक्षात गट आहेत, आम्हाला राणे समर्थक म्हणून बाजूला ठेवले जाते. नेमणुकांमध्ये डावलले जाते. शहराध्यक्ष पदासाठी १३ जणांचे अर्ज आले असता एकाचीही मुलाखत न घेता उद्धवसेनेतून एकटेच आलेल्या शशिकांत मोदींची निवड करण्यात आली. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत कैफियत मांडूनही फरक पडला नाही, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पक्षांतर्गत आढावा घेताना विकास कामांना निधी मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद भुरण, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रमोद अधटराव यांच्यासह पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणालाही पदे देताना आम्हाला विचारावेच लागेल
भाजपामधील धुसफूस, वाढलेले गटतट आणि कार्यकर्त्यांनी भर मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेमुळे खासदार राणे यांनी पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांना गटतट बाजूला ठेवण्याची सूचना करतानाच पक्षातील वरिष्ठांनाही इशारा दिला. येथे पदे देताना आम्हाला विचारावेच लागेल, असेही ठणकावून सांगितले.