(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी येथे २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित जिल्हा युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उत्कृष्ट सादरीकरण करून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
या स्पर्धेत महाविद्यालयाने लोकनृत्य आणि पथनाट्य या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच काव्यलेखन स्पर्धेत वेदश्री जाधव हिने द्वितीय, तर कुंदन सागवेकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. साई जिरोळे, प्रा. आर्या वंडकर तसेच सर्व मार्गदर्शकांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आणि ‘माय भारत’ पोर्टलचे जिल्हा समन्वयक सम्राट पाटील यांची उपस्थिती होती.
जिल्हा युवा महोत्सवातील या यशामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील समृद्ध परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


