(लांजा / प्रतिनिधी)
पोलीस विभागातील तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर लांजा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय रामचंद्र मारळकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. गुरुवारी झालेल्या या पदोन्नतीमुळे लांजा शहरातील बौद्धवाडीचे रहिवासी असलेल्या मारळकर यांच्या प्रदीर्घ सेवेला महत्त्वाची पावती मिळाली आहे.
संजय मारळकर हे १९९४ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी रत्नागिरी, दापोली, खेड आणि देवरूख यांसह विविध ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. देवरूख येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली असून, सध्या ते लांजा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठा, प्रदीर्घ अनुभव आणि पोलीस सेवेत केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने लांजा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मारळकर यांच्या पदोन्नतीबद्दल सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शिवराम कांबळे आणि प्रभाकर जयराम कांबळे यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. प्रदीर्घ पोलीस सेवेत त्यांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मिळालेली ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या सेवाभाव, अनुभव आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


