(रत्नागिरी /प्रतिनिधी)
भाट्ये येथील कोहिनूर हॉटेलमध्ये कामावर असताना अचानक प्रकृती बिघडलेल्या ५२ वर्षीय कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. अविनाश यशवंत पाटील (वय ५२, रा. खांबड, नाखरे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. त्यांना मधुमेहाचा आजार होता. या घटनेची पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हे भाट्ये येथील कोहिनूर हॉटेलमध्ये खासगी नोकरी करीत होते. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ते घरातून कामाच्या ठिकाणी आले होते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करीत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलाला, मंथन अविनाश पाटील यांना बोलावून घेतले. त्यानंतर अविनाश पाटील यांना प्रथम उपचारासाठी पावस येथील डॉ. बच्चे यांच्याकडे नेण्यात आले. तेथील प्राथमिक तपासणीनंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, पावस येथे पाठविण्यात आले. मात्र, प्रकृतीची स्थिती लक्षात घेऊन तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, वैद्यकीय मत राखीव ठेवण्यात आले आहे. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.


