(लांजा)
शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क कॉम्प्लेक्समधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी १०:३० ते ११:०० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क येथील तिसऱ्या मजल्यावर रुहीदा हनिफ नेवरेकर (वय ५३) या राहतात. त्या त्याच इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या त्यांच्या जाऊबाईंकडे औषधोपचारासाठी सदनिकेला कुलूप लावून गेल्या होत्या. अर्धा तासाने त्या पुन्हा आपल्या सदनिकेजवळ आल्या असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. तसेच दागिन्यांचे बॉक्स खाली पडलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लांजा पोलिस स्थानकात जाऊन माहिती दिली.
या चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केगडे, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, उपनिरीक्षक देवकन्या मैदाड, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नितेश राणे, सुयोग वाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांनी २ सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, कानातील टॉप जोडी, ३ अंगठ्या, चांदीची चेन आणि रोख रक्कम १२ हजार असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैदाड या करत आहेत.