(लांजा /प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटनांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना, मुंबई आणि ग्रामीण संघटनेच्या वतीने २० सप्टेंबर रोजी स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. स्थानकाच्या विकासासह महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे.
विलवडे हे लांजा तालुक्याच्या पूर्व भागासह राजापूर तालुक्यातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मात्र, या स्थानकावर आवश्यक त्या सुविधा आणि प्रमुख गाड्यांचे थांबे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा संघटनेचा दावा आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थांना एकत्रित करून आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. विलवडे स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस आणि कोचिवेली एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आहे. या गाड्यांना थांबा मिळाल्यास लांजा तालुक्याच्या पूर्व भागासह राजापूर तालुक्यातील प्रवाशांना मुंबई, गोवा आणि अन्य प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकते.
स्थानकावर दुसऱ्या फलाटाची निर्मिती करण्याबरोबरच दोन्ही फलाटांना जोडणारा पादचारी उड्डाणपूल उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकावरील उपलब्ध सुविधांचा विचार करता या मूलभूत पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय विलवडे स्थानकावर थांबा असलेल्या कोकणकन्या, दिवा पॅसेंजर आणि तुतारी एक्स्प्रेसला आरक्षणाचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी विलवडे रेल्वे स्थानकावर त्यांचे तैलचित्र लावण्यास अनुमती द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तसेच स्थानिक प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी खेड-सावंतवाडी लोकल गाडी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विलवडे रेल्वे स्थानकाच्या प्रश्नांवर प्रथमच मोठ्या प्रमाणावर लाक्षणिक उपोषण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या आंदोलनासाठी लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच राजापूर तालुक्यातील स्थानकाशी संबंधित गावांमधील प्रवासी, ग्रामस्थ आणि नागरिक एकवटत आहेत. मागण्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विलवडे स्थानकाचा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नसून लांजा-राजापूरच्या विस्तीर्ण ग्रामीण भागाच्या दळणवळणाशी निगडित आहे. त्यामुळे २० सप्टेंबरच्या उपोषणाकडे रेल्वे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.


