(पालघर)
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये २४ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मामू उर्फ छोटे उर्फ बाबू ओमप्रकाश श्रीसाहू दिवाकर (वय ५०) याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. ही माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाल यांनी दिली.
ही घटना १४ जानेवारी २००१ रोजी घडली होती. विरार परिसरात मोहर्रम अली मोहम्मद इब्राहिम अली (वय ४६) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी मामू आणि हारुन अली मुस्तकीन अली सय्यद या दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
ही हत्या केवळ ऑटोरिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडली होती. मृत मोहर्रम अली हा आरोपी मामूच्या रिक्षातून नेहमी प्रवास करत असे, मात्र भाडे न भरल्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेले आणि त्यातूनच खुनाची ही घटना घडली.
या प्रकरणात हारुन सय्यद याला घटनेनंतर लगेचच अटक झाली होती. मात्र मामू मात्र पोलिसांना चकवा देत २४ वर्षे फरार राहण्यात यशस्वी ठरला.
अलीकडेच या खटल्याच्या तपासाला नव्याने गती देण्यात आली. पोलिसांनी त्यासाठी जुन्या रिक्षाचालकांचे रेकॉर्ड, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) नोंदी तसेच आरोपीच्या मुलगा आणि भाच्याच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.
अखेर कानपूरमधील हामिदपूर रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशेष पथकाने मामूला अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.