(लांजा)
लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत 2025’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत मोरेवाडी समाजमंदिर, आगवे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांची एक्स-रे, रक्तदाब (BP), शुगर, रक्त, लघवी, स्पुटम यांसारख्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे होते. शिबिराचे उद्घाटन समाजसेवक संदीप किरण गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. रविंद्र कृष्णा मोरे आणि सुखादेवी भक्त मंडळ, आगवे यांनी कार्यक्रमात विशेष सहकार्य केले.
आरोग्य विषयक मार्गदर्शन
DTC आरोग्य सहाय्यक श्री. मंगेश पाटील यांनी कीटकजन्य व जलजन्य आजारांपासून संरक्षणासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती दिली. या वेळी STS श्री. मिलिंद संसारे, लॅब टेक्निशियन श्री. मिथिन मयेकर, एक्स-रे तज्ज्ञ श्री. निलेश हंगे, आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव (प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू), गटप्रवर्तक श्रीमती एस.एस. लोटणकर, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच आगवे व जोशीगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:
टीबी मुक्त मोहिमेप्रसंगी आरोग्य सहाय्यक श्री. मंगेश पाटील व निरीक्षक श्री. दिलीप गुरव यांचे स्वागत करताना समाजसेवक संदीप गुरव व अन्य मान्यवर.
(फोटो सौजन्य: दिनेश पेटकर, गावखडी)