(नवी दिल्ली)
इन्कम टॅक्सचे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) उपसंचालक असलेल्या चिंतन रघुवंशी यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) भुवनेश्वरमध्ये केली असून, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.
रघुवंशी हे भारतीय महसूल सेवा (IRS) 2013 बॅचचे अधिकारी आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात एका खाण व्यावसायिकाचे नाव वगळण्यासाठी त्यांनी एकूण 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. व्यावसायिक राऊत यांनी याबाबत CBIकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार CBIने सापळा रचून, 20 लाखांची पहिली रक्कम स्वीकारताना रघुवंशी यांना त्यांच्या कार्यालयातच अटक केली.
अटकवेळी सापळ्यात वापरलेली रक्कम जप्त करण्यात आली असून, CBIने रघुवंशी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापे टाकून महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीनुसार, रघुवंशी यांनी ‘भगती’ नावाच्या व्यक्तीमार्फत व्यावसायिकावर पैसे देण्यासाठी दबाव आणला होता. यामध्ये लाच देल्यास अटक, हॉस्पिटल जप्ती आणि प्रकरण मिटवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
राऊत यांनी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवताच सुरुवातीची 5 कोटी रुपयांची मागणी 2 कोटीवर, आणि शेवटी 50 लाखांवर आली. अखेर तडजोडीनंतर 20 लाखांच्या पहिल्या हप्त्यावेळी रघुवंशी रंगेहाथ पकडले गेले.
CBIने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात आणखी कोणी अधिकारी किंवा दलाल सामील आहेत का, याची सखोल चौकशी सुरू आहे. चिंतन रघुवंशी हे गेल्या दीड वर्षांपासून भुवनेश्वरमधील ED कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते.