(गणपतीपुळे / वैभव पवार)
क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज रविवारी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्वयंभू श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजाअर्चा केली आणि श्रींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
सचिन तेंडुलकर यांच्या गणपतीपुळे भेटीदरम्यान श्री देव गणपतीपुळे संस्थानचे वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच श्री गणपती मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि या तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्यपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या असामान्य फलंदाजीच्या कौशल्याने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या या भेटीमुळे गणपतीपुळे परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूने स्वयंभू श्री गणरायाचे दर्शन घेतल्याची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.
गणपतीपुळे हे राज्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ असून, स्वयंभू श्री गणेशाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी होते. सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या लोकप्रिय क्रिकेटपटूने या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिल्याने गणपतीपुळ्याच्या धार्मिक महत्त्वासोबतच या भेटीचीही परिसरात विशेष चर्चा सुरू झाली.


