(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावर कुवारबाव येथील पाटबंधारे वसाहतीसमोर दुचाकीच्या धडकेत ७२ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. विरुद्ध दिशेने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दुचाकीचालक सरदार शाम रमेश खानविलकर (वय २८) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सोनू पवार (वय ७२, रा. जागुष्टे कॉलनी, कुवारबाव, रत्नागिरी) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेंद्र काशिनाथ खापरे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी खानविलकर हा आपल्या ताब्यातील सुझुकी अॅक्सेस दुचाकीवरून (एमएच ०८ बीए ९०१७) आरटीओ रस्त्याच्या दिशेने येऊन हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावरून कुवारबाव बाजारपेठेकडे जात होता. पाटबंधारे वसाहतीसमोर आल्यानंतर वाहतुकीचे नियम आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने दुचाकी विरुद्ध दिशेने, हयगयीने व बेदरकारपणे चालवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी कुवारबावच्या दिशेने येणारे पादचारी अशोक पवार यांना दुचाकीची समोरून धडक बसली. या अपघातात पवार गंभीर जखमी झाले, तर दुचाकीचालकालाही किरकोळ दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघाताबाबत पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


