[ मुंबई ]
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा सुरू असताना, खासदार खरेदीसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमधून या घडामोडींवर भाष्य करत, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जात असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे,” असा आरोप केला. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.
https://x.com/i/status/2066940812504727906
दरम्यान, शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा ज्या खासदारांबाबत सुरू आहे त्यामध्ये संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र सहाव्या खासदाराचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाकरे गटाच्या लोकसभा खासदारांमध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. यापैकी काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याच्या वृत्तांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन संबंधित खासदारांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही खासदारांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठिंब्याचे पत्र दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याचवेळी ठाकरे गटानेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. संभाव्य राजकीय आणि कायदेशीर परिणामांचा आढावा घेण्यासाठी ते सल्लामसलत करत असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या अवघ्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगली असून ‘ऑपरेशन टायगर’ नेमके कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

