(डिजिटल डेस्क / नवी दिल्ली)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या २३ व्या दिवशी आज प्रस्तावित ‘संसद चलो’ मोर्चा केंद्रस्थानी आला असून, राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संसद भवन परिसराकडे जाणारे सर्व प्रमुख मार्ग सील करण्यात आले असून, दिल्ली पोलिसांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. दुसरीकडे, प्रकृती खालावल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारने आंदोलनाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका पुन्हा मांडली आहे.
जंतर-मंतर येथे सुमारे आठ हजारांहून अधिक आंदोलक जमल्याचा दावा करण्यात येत आहे. कथित नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले की, ‘संसद चलो’ मोर्च्यानंतरच ते उपोषण सोडण्याचा निर्णय घेतील. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने पेपरफुटीसह शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी स्वीकारावी किंवा त्यांना व आंदोलनाच्या नेत्यांना संसदेत जाण्याची परवानगी देऊन खासदारांकडून हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचे लेखी किंवा स्पष्ट आश्वासन मिळावे, अशी त्यांची अट आहे. प्रकृतीमुळे मोर्चात सहभागी होणे शक्य न झाल्यास, राजकीय नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष आश्वासन द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. याचवेळी वांगचुक यांनी गंभीर आरोप करत, “मला रुग्णालयात बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवण्यात आले असून माझ्या हालचाली, संवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत,” असा दावा केला.
५६ इंच वाल्यांची हातभर…
खासदार संजय राऊत यांनी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर एक्स अकाऊंटवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभर फा#$. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ED लावली असती. पण ते कठीण आहे. मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा. Ed, सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी, शाहांच्या गुलाम झाल्या आहेत,” अशी टीका त्यांनी केलीय.
राजधानीत कडेकोट सुरक्षा कवच
प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण मध्य दिल्लीला अक्षरशः सुरक्षा कवच दिले आहे. संसद भवन, रेल भवन, इंडिया गेट आणि अन्य अतिसंवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, दंगल नियंत्रण पथके, बख्तरबंद वाहने तसेच आरएएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जंतर-मंतर परिसराला चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावून सील करण्यात आले असून संसदेकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. बीएनएसएस कलम १६३ अंतर्गत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून संसदेकडे मोर्चा काढण्याचा कोणताही प्रयत्न बेकायदेशीर जमाव मानला जाईल, असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसून, शेजारील राज्यांतून येणाऱ्या आंदोलकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, ‘संसद चलो’ मोर्चा, वांगचुक यांच्या उपोषणाची भूमिका आणि दिल्लीतील कडेकोट सुरक्षा व्यवस्था यामुळे आज देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

