(न्यूयॉर्क)
जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेने रशियाची कोंडी करण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांना ‘कठोर परिणामांना’ सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी रशियावर अतिरिक्त दबाव टाकण्याच्या हेतूने हा नवा निर्णय असल्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांनी अनेक वेळा युक्रेन युद्ध संपवण्याबाबत विधान केले असले तरी प्रत्यक्ष प्रगती झाली नाही. त्यामुळे आता ट्रम्प प्रशासन अधिक आक्रमक पावले उचलत आहे. सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सादर केलेल्या एका कठोर विधेयकात रशियन तेलाची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करीत विक्री करणाऱ्या देशांवर तब्बल ५०० टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीकडून एकमताने मंजुरी मिळाली आहे.
रशिया निर्बंध कायदा
सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि रिचर्ड ब्लूमेंथल यांनी मिळून ‘रशिया निर्बंध कायदा’ सादर केला आहे. या कायद्याचा उद्देश रशियाला थेट किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या देशांना कठोर कर व निर्बंधांच्या कक्षेत आणणे हा आहे. पत्रकारांनी याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्ट संकेत दिले की, “यावर काम सुरू आहे. आपण या यादीत इराणलाही सामील करू शकतो.”
भारतासाठी मोठा दिलासा?
ट्रम्प प्रशासनाने सध्या भारतावर ५० टक्के कर लादला आहे, ज्यातील २५ टक्के कर हा रशियन तेलाच्या खरेदीमुळे आहे. मात्र भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. कराराची घोषणा झाल्यास भारतावरील करकपात निश्चित मानली जात आहे. तथापि, किती कर कमी होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

