(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे. ही धडाकेबाज कारवाई खेड तालुक्यातील नवानगर लवेल येथे करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दि. 28 मे रोजी गस्तीदरम्यान LCB पथकाला संशयास्पद हालचाली करणारा एक युवक लवेल परिसरात आढळून आला. चौकशीअंती त्याची ओळख सचिन रामसहजीवन चव्हाण (वय 21, रा. आजगणी, नवानगर लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी पटली. तपासात उघडकीस आले की, आरोपीविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 111/2025 व 118/2025 नुसार भा.दं.वि. कलम 331(4), 305, 3(5) अंतर्गत गंभीर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या नजरेतून सुटलेला हा आरोपी अखेर जेरबंद करण्यात आला.
उक्त गुन्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या चोरीचे प्रकार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने विशेष लक्ष घालून तपास सुरु केला होता. आरोपी चोरी झालेल्या मालमत्तेबाबतची माहिती देतो का, याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयित सचिन चव्हाण याला पुढील कारवाईसाठी खेड पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई पो.नि. नितीन ढेरे (स्थानीय गुन्हे शाखा, रत्नागिरी), स.पो.नि. श्री. वाघ, पो.ह. श्री. बाळू पालकर, पो.ह. श्री. गणेश सावंत, पो.ह. श्री. सत्यजित दरेकर, पो.ह. श्री. विक्रम पाटील, पो.ह. श्री. रमिज शेख, चा.पो.शी. श्री. अनिकेत नलावडे यांनी केली.