(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दुचाकी गाडी दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने कर्मचाऱ्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर काठीने मारहाण केल्याची घटना रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरात घडली. यावेळी ‘तू ड्युटी कशी करतोस, तेच बघतो’ असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. तसेच रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या दुचाकीला लाथ मारून नुकसान केल्याचे आणि एका साक्षीदाराला फोनवरून धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भोज राठोड (वय ४१, सध्या रा. रहाटाघर, एसटी स्टँड परिसर, रत्नागिरी; मूळ रा. तांडा, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आठवडा बाजार येथील देशी बारसमोर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने दुचाकी दिली नाही, याचा राग मनात धरून दीपक राठोड (संपूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादीच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला लाथ मारून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, एका साक्षीदाराला फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


