(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकण आणि मासळी यांचे नाते अतूट आहे. येथील विविध भागांत मिळणाऱ्या मासळीच्या वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकही कोकणाला पसंती देतात. स्थानिकांसाठी तर मासळी हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. फावल्या वेळेत मासेमारी करणे हा अनेकांचा आवडता छंद असला, तरी त्यासाठी आवश्यक असलेली जाळी तयार करणाऱ्या पारंपरिक कारागिरांसमोर मात्र आता विक्रीचा प्रश्न उभा राहिला आहे. आठवडाभर मेहनत करून तयार केलेल्या एका छोट्या जाळ्याची किंमत अवघी ५०० रुपये असतानाही ग्राहकांकडून त्यासाठी कमी दराची मागणी केली जात असल्याने या कारागिरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ओढे, नाले, नद्या आणि समुद्र अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते. मासेमारीतून उपजीविका करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी जाळे हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जाळ्यांचेही अनेक प्रकार असून, छोट्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांसाठी लागणारी छोटी जाळी स्थानिक कारागीर स्वतःच्या हाताने तयार करतात. रात्री मासेमारी करायची आणि दिवसा जाळी विणायची, अशी दुहेरी मेहनत या मंडळींना घ्यावी लागते. बारीक तंगूस वापरून अत्यंत कौशल्याने आणि संयमाने ही जाळी विणली जातात. एका छोट्या जाळ्याच्या निर्मितीसाठी जवळपास आठवडाभराचा कालावधी लागतो.
संगमेश्वरजवळील तेर्ये-बुरंबी येथील कुवेट परिसरात मासेमारी करणारी अनेक कुटुंबे राहतात. प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर या मंडळींनी स्वाभिमानाने आपले जीवन उभे केले आहे. दिवसरात्र मासेमारी करून त्यांनी केवळ आपले राहणीमान उंचावले नाही, तर भव्य घरेही बांधली आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबांतील मुलांनी उच्च शिक्षण घेतले असून, नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपले करिअरही स्थिर केले आहे.
याच परिसरातील ६५ वर्षीय तात्या साबळे आजही आपल्या पारंपरिक व्यवसायाशी जोडलेले आहेत. शालेय शिक्षण घेता आले नसल्याने त्यांनी बालपणापासूनच मासेमारीचा व्यवसाय स्वीकारला. मात्र, आपण शिक्षण घेऊ शकलो नाही तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. आज त्यांची मुले नोकरी आणि व्यवसायात स्थिरस्थावर झाली आहेत. तरीही रिकामे बसण्यापेक्षा काम करत राहावे, या विचारातून तात्या साबळे आजही रात्री मासेमारी आणि दिवसा जाळी विणण्याचे काम करतात. आठवडाभराच्या मेहनतीनंतर ते एक जाळे तयार करतात.
जाळे तयार करणे जितके कौशल्याचे काम आहे, तितकेच ते विकणेही जिकिरीचे ठरत आहे. स्वतः विणलेली जाळी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तात्या साबळे सकाळी आणि सायंकाळी बुरंबी बसथांबा ते करंबेळे बसथांबा या मार्गावर हातात जाळी घेऊन फिरतात. मात्र, आठवडाभर मेहनत घेऊन तयार केलेल्या जाळ्याची किंमत ५०० रुपये असतानाही काही ग्राहक त्यासाठी अत्यंत कमी किंमत देऊ करतात. एवढ्या कमी दरात जाळे विकणे परवडत नाही. कारण त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याचाही खर्च भागत नाही, अशी खंत तात्या साबळे व्यक्त करतात.
जाळे तयार करताना त्याच्या तळाशी मातीची पोकळ गुळी लावली जाते. यासाठी लागणारी माती गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाने येथून आणावी लागते. या मातीच्या वाहतुकीसाठी आता करही आकारला जात असल्याचे तात्या साबळे यांनी सांगितले. कच्च्या मालाचा खर्च, जाळे विणण्यासाठी लागणारा वेळ आणि विक्रीसाठी करावी लागणारी पायपीट, या सगळ्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
पारंपरिक कौशल्य, मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर हाताने जाळी विणण्याची कला आजही जिवंत ठेवणारे तात्या साबळे यांच्यासारखे अनेक कारागीर मात्र योग्य मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. आठवडाभर मेहनत करून तयार केलेल्या जाळ्याला अपेक्षित किंमत मिळत नसेल, तर अशा पारंपरिक व्यवसायात टिकून राहणे कठीण होणार आहे. त्यामुळे हाताने जाळी विणणाऱ्या कारागिरांचे कौशल्य आणि त्यांची मेहनत यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे चित्र या परिस्थितीतून समोर येत आहे.


