( खेड )
भरधाव बुलेटची समोरासमोर धडक लागून ५३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर घडली. या अपघातप्रकरणी खेड पोलिसांनी २० वर्षीय आरोपी तरुणाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मयताचे नाव मोहन मनोहर आंब्रे (वय ५३, रा. लोटेनवीन वसाहत, मूळ रा. चिरणी खालचीवाडी, ता. खेड) असे असून, ते चिरणी येथील त्यांच्या घराच्या कामानिमित्त गेले होते. काम उरकून ते बुलेट (क्र. MH 08 AU 3495) ने लोटे येथे परत येत होते. दि. १७ जून रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास, चिरणी शहीद स्मारकाजवळील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर ते आले असता समोरून येणाऱ्या भरधाव बुलेटने (क्र. MH 08 AK 2211) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातातील बुलेट आदित्य दिलीप मोरे (वय २०, रा. आंबडसपेठ, ता. खेड) याच्या ताब्यात होती. त्याने विमा संपलेली बुलेट निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या धडकेत मोहन आंब्रे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आरोपी मोरे यालाही किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही बुलेटचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९४/२०२५ प्रमाणे भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(२), २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन अधिनियमाचे कलम १८४, १४६/१९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोफौ उदय संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून, या अपघाताने चिरणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.