(रत्नागिरी)
१२जून रोजी जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ पाळला जात असताना महाराष्ट्र शासनाने ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बालमजुरी ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असल्याची माहिती रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी पंकज धोंडीराम खांडेकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी बालमजुरीविरोधात जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बालमजुरी हा गंभीर फौजदारी गुन्हा
बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम १९८६ नुसार बालमजुरी हा दखलपात्र आणि गंभीर फौजदारी गुन्हा मानला जातो. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
१४ वर्षांखालील बालकांना हॉटेल, ढाबे, बांधकाम, फॅक्टरी किंवा घरगुती कामांसाठी रोजगार देण्यास पूर्णपणे बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मालकाला २० हजार रुपयांपर्यंत दंड आणि एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
तसेच १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे देखील कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे. अशा प्रकरणांमध्ये ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यात विशेष कृतीदल सक्रिय
बालकामगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे. या कृतीदलामध्ये विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हाभर सातत्याने तपासणी मोहीम आणि धाडी टाकण्यात येणार आहेत.
सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षण यंत्रणेमार्फत विविध ठिकाणी सर्वेक्षण आणि पडताळणी सुरू करण्यात आली आहे. तसेच सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे
सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी सांगितले की, “आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक बालके लहान वयातच कामाच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून न पाहता समाजाची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे.”
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. कुठेही बालमजुरी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी आणि बालकांचे शोषण थांबवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

