(रत्नागिरी)
शहराजवळील कुवारबाव व परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुवारबाव येथील श्री विठ्ठल मंदिर शेजारील महालक्ष्मी मंडळ पटांगण येथे हे संमेलन पार पडणार आहे.
या संमेलनात हिंदुत्व, हिंदू समाजासमोरील सध्याची आव्हाने तसेच पंचपरिवर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी या परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देशाला विश्वगुरूपदी नेण्यासाठी हिंदू समाज संघटित व कृतीशील होण्याची आवश्यकता अधोरेखित करत, समाजातील ऐक्य बळकट करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे. संमेलनास उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी शक्यतो मंगल वेशात यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

