(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा-राजापूर आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डायलिसिस रुग्णांची उपचारसेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. डायलिसिस सेंटर बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास उद्याच स्वतः पुढाकार घेऊन सेंटर सुरू करणार असून, गरज भासल्यास टेक्निशियनचा पगारही स्वतःच्या खिशातून देणार, अशी ठाम भूमिका आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी घेतली आहे. रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित एजन्सीला त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
डायलिसिस ही किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचारपद्धती आहे. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे उपचार केंद्र अचानक बंद झाल्यास रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर ही सुविधा अखंडित सुरू राहणे गरजेचे असल्याचे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.
डायलिसिस सेंटर बंद करण्यासाठी संबंधित एजन्सीने कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नयेत, असे त्यांनी बजावले आहे. उपचारसेवा बंद पडल्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील. जाणीवपूर्वक रुग्णसेवा बंद करून त्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात मनुष्यवधासह लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डायलिसिस सेंटर बंद करण्यामागे टेक्निशियन किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असल्यास तो सोडविण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असेही आमदार सामंत यांनी सांगितले. प्रशासनाने अथवा संबंधित यंत्रणेने सेंटर बंद करण्याचा प्रयत्न केल्यास सध्याच्या टेक्निशियनना सोबत घेऊन त्यांच्या वेतनाची जबाबदारी स्वतःच्या खर्चातून उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कोणत्याही आर्थिक किंवा प्रशासकीय कारणामुळे डायलिसिस सेवा खंडित होता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे.
लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरातील डायलिसिस रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आधीच आर्थिक आणि प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेली उपचार केंद्रे बंद करून रुग्णांच्या अडचणी वाढविणे योग्य नाही. प्रशासकीय निर्णय असो किंवा आर्थिक प्रश्न, त्यासाठी सामान्य रुग्णांना वेठीस धरले जाऊ नये. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
डायलिसिससारखी जीवनावश्यक आरोग्यसेवा सुरू ठेवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार सामंत यांनी व्यक्त केली. सेंटर बंद करण्याऐवजी कर्मचाऱ्यांचे वेतन, आवश्यक मनुष्यबळ आणि प्रशासकीय अडचणी सोडविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लांजा-राजापूर आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील एकाही डायलिसिस रुग्णाला उपचारांअभावी संकटाचा सामना करावा लागू देणार नाही. गरज पडल्यास स्वतःच्या खर्चातून टेक्निशियनचे वेतन देऊनही ही सेवा सुरू ठेवू; मात्र कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेंटर बंद होऊ देणार नाही, असा निर्धार आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला.


