(नवी दिल्ली)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे बंधू स्नेहाशीष गांगुली आणि वहिनी अर्पिता गांगुली पुरी समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स करत असताना स्पीडबोट उलटल्याने मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. ही घटना शनिवारी संध्याकाळी लाईटहाऊसजवळ घडली असून, पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.
घटनेच्या वेळी स्नेहाशीष आणि अर्पिता स्पीडबोटमध्ये होते. समुद्रातील उसळलेल्या लाटांमुळे बोट अचानक उलटली आणि दोघे पाण्यात फेकले गेले. बचाव पथकाने तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात स्पीडबोट उलटताना आणि बचावकार्य सुरू असलेले दृश्य दिसते.
घटनाबाबत बोलताना अर्पिता गांगुली म्हणाल्या, “बोट हलकी होती आणि समुद्र अतिशय खवळलेला होता. बोट चालकाने केवळ ३-४ प्रवाशांसह बोट समुद्रात घेतली. आम्ही भीती व्यक्त केली होती, पण त्यांनी परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले.”
अर्पिता यांनी पुढे सांगितले, “इतक्या उंच लाटा आम्ही याआधी कधीच पाहिल्या नव्हत्या – जणू १० मजली इमारतीसारख्या त्या होता. बोट उलटल्यावर आम्ही तिच्या खाली अडकलो होतो. डिझेल अंगावर सांडले होते. यावेळी तेथील तरुणांनी वेळेवर मदत केली नसती, तर आम्ही वाचलो नसतो.”
त्यांनी या घटनेनंतर संबंधित बोट ऑपरेटरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, “पुरी समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सला बंदी असावी,” असेही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “कोलकात्याला परत गेल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अधिकृत तक्रार दाखल करणार आहे.”