(चिपळूण)
चिपळूणच्या सूनबाई आणि सुप्रीम कोर्टातील नामवंत विधिज्ञ ॲड. प्रज्ञा बघेल-चितळे या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी निवडून आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी १२४१ मते मिळवत ५४१ मतांच्या आघाडीने विजय संपादन केला. या निवडीने त्या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील केवळ चौथ्या महिला सेक्रेटरी ठरल्या आहेत.
ॲड. प्रज्ञा बघेल-चितळे या सुप्रीम कोर्टात सक्रिय असलेल्या ॲड. अमोल सुधीर चितळे यांच्या पत्नी असून, चिपळूणचे सुप्रसिद्ध विधिज्ञ कै. ॲड. सुधीर चितळे यांच्या सूनबाई आहेत. काही वर्षांपूर्वी ॲड. प्रज्ञा बघेल आणि ॲड. अमोल चितळे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे प्रज्ञा बघेल या चिपळूणच्या सूनबाई झाल्या आहेत.
या निवडणुकीत त्यांनी सेक्रेटरी पदासाठी उमेदवारी दिली होती. स्वतः प्रज्ञा बघेल व त्यांचे पती अमोल चितळे यांनी निवडणुकीसाठी मोठी मेहनत घेतली होती. एकूण २६०० मतांपैकी १२४१ मते मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
या यशाबद्दल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन, मुंबई उच्च न्यायालय असोसिएशन, तसेच विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर व संस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक युवा वकील राज्य व केंद्र पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. या परंपरेत आता ॲड. प्रज्ञा बघेल-चितळे यांचे नाव समाविष्ट झाले आहे.
त्यांच्या निवडीनंतर चिपळूणकरांमध्ये आणि विधिज्ञ मंडळींमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून, त्यांच्या यशामुळे चिपळूणचे नाव विधी क्षेत्रात अधिक उजळले आहे.