(बीड)
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराड सध्या बीड कारागृहात असून, तिथे त्याला ‘व्हीआयपी’ सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे.
कासले यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत सांगितले की, कराडला तुरुंगात फरसाण, तेल लावलेल्या चपात्या तसेच बुधवार व रविवारी खास चिकन मिळत असल्याची माहिती आहे. त्यांनी यासोबतच तुरुंगातील इतर आरोपींपेक्षा कराडला वेगळी आणि विशेष वागणूक दिली जात असल्याचाही आरोप केला.
त्यांनी म्हटले की, “वाल्मीक कराडला तुरुंगात सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. माझ्या तुरुंगातील अनुभवात प्लास्टिकच्या कपात चहा मिळायचा, आणि येथे काही आरोपींना शाही जेवण दिले जाते.”
कासले यांनी या प्रकरणात अंजली दमानिया, करुणा मुंडे व तृप्ती देसाई यांच्याकडे हस्तक्षेपाची विनंती केली आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, कराडला बीड कारागृहातून हलवून नागपूर किंवा पुणे येथे स्थानांतरित करावे, कारण बीड कारागृहात त्याच्या जीवाला धोका आहे.
याआधी जिल्हा रुग्णालयात कराडला देण्यात आलेल्या विशेष उपचारांमुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. आता तुरुंग प्रशासनावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

