(शिर्डी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ड्रग्ज प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री चौकशी होण्याआधीच संबंधितांना क्लीन चिट देतात, अशी सवय असल्याचा आरोप त्यांनी केला.
“रणजित निंबाळकर असो किंवा अन्य कोणीही असो, मुख्यमंत्री लगेच क्लीन चिट देतात. तुम्ही मुख्यमंत्री आहात, न्यायाधीश नाहीत. जर क्लीन चिट द्यायचीच असेल, तर दालनाबाहेर पाटी लावा – इथे क्लीन चिट मिळते,” असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. अशा भूमिकेमुळे तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुन्हेगार आहेत, असं मी एकदाही म्हटलेलं नाही, असं स्पष्ट करत अंधारे म्हणाल्या की, ड्रग्ज प्रकरणात प्रकाश शिंदे हे नाव समोर आलं असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. “वाल्मिक कराड प्रकरणात राजकीय फायदा होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. पार्थ पवार प्रकरणातही अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्याच न्यायाने प्रकाश शिंदे यांच्या चौकशीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
“एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणापासून बाजूला राहावं. तपास पूर्ण होऊ द्या. त्यांचे भाऊ निर्दोष ठरले, तर ते पुन्हा उपमुख्यमंत्री नव्हे, तर मुख्यमंत्रीही व्हावेत. मी स्वतः अभिनंदनाचा पुष्पगुच्छ घेऊन येईन,” असा टोमणाही अंधारे यांनी मारला.
ड्रग्ज प्रकरणातील विशाल मोरे हा मुख्य सूत्रधार नसून केवळ वाहतूकदार असण्याची शक्यता असल्याचं सांगत त्यांनी तपासाच्या वेळापत्रकावरही प्रश्न उपस्थित केले. घोडबंदर, मुलुंड, पुणे आणि लोकेश्वरी येथील धाडींचा उल्लेख करत, या प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक, त्यांचे गाव आणि ठाणे जिल्हा जोडला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. “मी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली.
याआधीही काही प्रकरणांमध्ये एन्काऊंटर करून तपास दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, विशाल मोरेचा एन्काऊंटर होण्याची भीती अंधारे यांनी व्यक्त केली. तसेच विशाल मोरे आणि धाड टाकणारे अधिकारी आत्माजी सावंत यांना तात्काळ सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. “मलाही मुख्यमंत्री यांनी सुरक्षा द्यावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो आणि पारदर्शकता दाखवण्यासाठी त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं, अशी शंकाही अंधारे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २२ आणि २३ डिसेंबर रोजी ड्रग्ज प्रकरणासंदर्भात आणखी पुरावे मीडियासमोर मांडणार असल्याचं जाहीर करत, “या काळात मला काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल,” असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला. “माझ्यावर कितीही दबाव टाकला, धाडी टाकल्या, तरी आमचं इमान विकत घेता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विनाकारण न्यायाधीशाची भूमिका घेऊ नये,” असंही त्या म्हणाल्या.

