(पुणे)
राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून गेल्या २४ तासांत ४३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईतील असून, पुण्यातही ८ रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात एकूण २४२ रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार:
मुंबई: ३५ नवीन रुग्ण
पुणे महापालिका क्षेत्र: ७ रुग्ण
पुणे ग्रामीण: १ रुग्ण
राज्यात १ जानेवारी ते २५ मे दरम्यान एकूण ७,३८९ करोनासंदर्भातील चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ३०० जणांना करोनाचा संसर्ग आढळून आला असून त्यातील २४८ रुग्ण मुंबईतील आहेत.
सद्यस्थिती (२५ मे २०२५ पर्यंत):
एकूण रुग्ण: ३००
सक्रिय रुग्ण: २०९
बरे झालेले रुग्ण: ८७
मृत्यू: ४ (सर्व रुग्ण सहव्याधीग्रस्त)
मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक आणि गंभीर मधुमेहासारख्या गंभीर सहव्याधी होत्या, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सरकारची उपाययोजना:
करोनाचा प्रसार लक्षात घेता राज्य आरोग्य विभागाने फ्लू आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. संशयित रुग्णांची चाचणी घेण्यात येत असून, सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
“नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सावधगिरी बाळगा, पण भीती नको,” असे आवाहन राज्याच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.