( पुणे )
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 41 मधील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सादिक कपूर यांनी पुण्यातील लष्कर भागात असलेल्या त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केली.
कार्यालयातच आत्महत्या, सुसाइड नोट सापडली
आत्महत्येपूर्वी सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसरमधील उमेदवाराचे नावही त्यात असल्याचे समजते. सय्यद नगर परिसरातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून सादिक कपूर मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
चार जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार, अफ्फान फारुख इनामदार, जहुर सय्यद आणि तन्वीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक कपूर यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या संदर्भात पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर म्हणाल्या, “शनिवारी संध्याकाळी सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुसाइड नोटमध्ये एकूण 38 जणांची नावे आहेत. जमिनीच्या वादामुळे सादिक कपूर मानसिक दबावाखाली होते. मुलाच्या तक्रारीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

