(पुणे)
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात गुलाबी थंडीचा अनुभव येत असून, किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सियसपेक्षा खाली नोंदवले जात आहे. रविवारी यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान हवेली येथे ६.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले.
उत्तर दिशेकडून वाहणारे थंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे पुणे व परिसरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रविवारी शिवाजीनगर येथे ८.४ अंश, पाषाण येथे ८.३ अंश, तर दौंड येथे ८.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
यापूर्वी शनिवारी हवेली येथे ६.६ अंश, तर गुरुवारी ८.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
थंडीच्या लाटेचा धोका नाही, मात्र धुक्याची शक्यता
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबरनंतर राज्यात रात्रीच्या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता नाही. पुण्यासह महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा नसला, तरी रात्री उशिरा किंवा पहाटे काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा तसेच उत्तर भारतातील काही भागात धुके पडण्याची शक्यता असून, वाऱ्यांच्या दिशेत अंशतः बदल झाल्यामुळे महाराष्ट्र, गुजरात व उत्तर भारतातील काही भागांत उंच ढग दिसून येऊ शकतात.
राज्यात अनेक ठिकाणी एक अंकी तापमान
दरम्यान, रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागांत एक अंकी किमान तापमानाची नोंद झाली. त्यामध्ये अहिल्यानगर येथे सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
इतर प्रमुख शहरांतील तापमान पुढीलप्रमाणे
जळगाव – ९ अंश
मालेगाव – ८.२ अंश
नाशिक – ९.२ अंश
परभणी – ८.९ अंश
बीड – ८.९ अंश
अमरावती – ९ अंश
गोंदिया – ८ अंश
नागपूर – ८.२ अंश
वर्धा – ९.४ अंश
यवतमाळ – ८.५ अंश
दहा वर्षांतील किमान तापमानाचा आढावा
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, गेल्या दहा वर्षांत डिसेंबर महिन्यातील सर्वांत कमी तापमान २०१८ मध्ये ५.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. २०१५ मध्ये ६.६ अंश, तर गेल्या वर्षी ८.७ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली होती.

