(नागपूर)
कोतवालनगर येथील सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या विरोधात कामातील हलगर्जी आणि अनियमिततेचे आरोप समोर आल्यावर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देत थेट कारवाई केली आहे. कपले यांच्या ड्रॉवरमध्ये रोख नोटा सापडल्यानंतर, महसूल विभागाने त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
सोमवारी, बावनकुळे यांनी कोतवालनगरातील गुलाब अपार्टमेंट, रिंगरोडवरील उपनोंदणी कार्यालय येथे अचानक धाड टाकली. या कार्यालयात रजिस्ट्रीसाठी कमिशनबाजी आणि अनियमित व्यवहार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. धाडीदरम्यान कपले यांच्या टेबलवरील ड्रॉवरमध्ये रोख नोटा सापडल्या, तसेच रजिस्ट्री प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकार आढळून आले.
महसूल विभागाने हा प्रकार गंभीरतेने घेत प्राथमिक चौकशी सुरू केली. अहवालानुसार, कपले यांचे निलंबन आदेश जारी करण्यात आले असून, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सहजिल्हा निबंधक वर्ग-२, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक कार्यालय, अमरावती विभाग येथे राहील, असे सूचित करण्यात आले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत, कपले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग केल्याचे निष्पन्न झाले. यावर आधारित महसूल विभागाने ही कारवाई केल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

